164 candidates withdrew from the election : माघारीच्या दिवशी राजकीय समीकरणे बदलली; थेट, तिरंगी व चौरंगी लढती निश्चित
Akola अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. अंतिम दिवशी तब्बल १६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. बंडखोरी, पक्षांतर्गत समन्वय तसेच आघाडी-युतीच्या राजकारणामुळे अनेक उमेदवारांनी माघार घेणे पसंत केल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला ६३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र माघार प्रक्रियेनंतर आता ४६९ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. या माघारींमुळे अनेक प्रभागांतील लढतींची समीकरणे बदलली असून, काही ठिकाणी थेट दुरंगी, तर काही प्रभागांत तिरंगी व चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.
झोननिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या :
झोन क्रमांक १ : २४
झोन क्रमांक २ : २५
झोन क्रमांक ३ : २६
झोन क्रमांक ४ : ३२
झोन क्रमांक ५ : २५
झोन क्रमांक ६ : ३२
एकूण : १६४
झोन क्रमांक चार आणि पाचमध्ये सर्वाधिक माघारी झाल्याचे चित्र असून, त्यामुळे या भागांतील लढती अधिक स्पष्ट झाल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून आले, त्याचा परिणाम माघारींच्या संख्येत स्पष्टपणे जाणवतो.
नामनिर्देशन व माघार प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाल्याने आता प्रचाराचा वेग वाढणार आहे. उर्वरित उमेदवार मतदारांची मने जिंकण्यासाठी ताकदीनिशी मैदानात उतरले असून, येत्या काही दिवसांत अकोल्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी नेमका कौल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








