Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजपचे ‘युवा कार्ड’! २५ वर्षीय नितू जगताप महापौरपदाच्या शर्यतीत

25-year-old Neetu Jagtap in the race for the mayor’s post : ‘शहर सुधार समिती’चा ४४ नगरसेवकांसह सत्तेवर दावा; पवन महल्ले यांच्याकडे गटनेतेपद

Akola अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, आता महापौरपदासाठी पक्षाने ‘तरुण चेहरा’ देण्याची तयारी सुरू केली आहे. ८० सदस्यीय सभागृहात भाजपने ४४ नगरसेवकांच्या भक्कम गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली असून, यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ३० जानेवारीला अकोल्याचा नवा महापौर कोण, याचा फैसला होणार असून, यामध्ये २५ वर्षीय नितू जगताप यांचे नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे.

निवडणुकीत ३८ जागा जिंकणाऱ्या भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ चा आकडा पार करण्यासाठी मित्रपक्षांशी हातमिळवणी केली आहे. भाजपचे ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, शिवसेना (शिंदे गट) १, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ३ आणि १ अपक्ष अशा एकूण ४४ नगरसेवकांचा मिळून ‘शहर सुधार समिती’ हा नवा गट नोंदवण्यात आला आहे. भाजपने गटनेतेपदी भाजयुमोचे महानगराध्यक्ष पवन महल्ले यांची निवड करून आपल्या ‘युवा रणनीती’चे संकेत दिले आहेत.

Amravati Municipal Corporation : ६६१ पैकी २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

 

यंदाचे महापौरपद ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपकडे अनेक पर्याय आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘४० टक्के तरुण’ धोरणानुसार नितू जगताप यांचे नाव आघाडीवर आले आहे. अवघ्या २५ वर्षांच्या असलेल्या नितू जगताप या पेशाने इंटेरियर डिझायनर असून प्रभाग ३-ब मधून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे अकोल्यातील अनुभवी नेते असून त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नितू यांची निवड झाल्यास त्या अकोला शहराच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर म्हणून ओळखल्या जातील.

Nitin Gadkari : गडकरींनी स्पष्टच सांगितलं, साहित्य संघाच्या निवडणुकीशी माझा संबंध नाही

निवडणुकीचा कार्यक्रम
विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार, महापौर आणि उपमहापौर पदासाठीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:
अर्ज वितरण: २६ जानेवारी (सोमवार)
अर्ज स्वीकारणे: २७ जानेवारी (मंगळवार)
निवडणूक आणि निकाल: ३० जानेवारी २०२६

सुरुवातीला काँग्रेस, एमआयएम आणि वंचितने भाजपला रोखण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, भाजपने दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन ४४ जणांचा गट उभा केल्याने विरोधकांचा सत्तेचा दावा आता कमकुवत झाला आहे. आता केवळ ३० जानेवारीला नितू जगताप यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.