व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जी; अकोला मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी...

Akola Municipal corporation : निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जी; अकोला मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Alleged negligence in election duty; orders issued to register a criminal case against an Akola Municipal Corporation employee : आढावा बैठकीस अनुपस्थिती, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष आणि मतदार यादी पुनरीक्षणात अडथळ्याचा ठपका

Akola मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातील निवडणूक कर्तव्यात कथित हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अकोला महानगरपालिकेतील लिपिक शरण वासनिक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक कर्तव्यात कसूर करणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कायदेशीर आदेशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत ३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) निखील खेमनार यांनी सिटी कोतवाली पोलिसांना यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत ३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक १८७ मधील पुनरीक्षणाची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात आली होती. या कामाचा आढावा घेण्यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना किंवा वैध कारण न देता संबंधित कर्मचारी बैठकीस अनुपस्थित राहिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

Ravi Rana, Balwant Wankhede : एक तरी ठोस विकासकाम दाखवा; मी तुमचा सत्कार करतो आणि बक्षीसही देतो

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच मतदार यादी पुनरीक्षणासाठी आवश्यक असलेले ‘ईएफ फॉर्म’ वेळेत वितरित न झाल्याची बाब बीएलओ पर्यवेक्षकांच्या अहवालातून समोर आली आहे. संबंधित फॉर्म घरी नेऊन नियमानुसार त्यांचे वितरण न केल्यामुळे निवडणूक कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोपही प्रशासनाने केला आहे.

या प्रकारामुळे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० मधील कलम ३२ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Bombay High Court : अकोला पश्चिम निवडणुकीची कागदपत्रे सुरक्षित ठेवा, न्यायालयाच्या आदेशांमुळे काँग्रेसचे आमदार अडचणीत

यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, गुन्हा नोंदविल्यानंतर त्याची प्रत तातडीने सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!