Akola Municipal Corporation : भाजपला पाठिंबा दिल्याप्रकरणी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

Five MIM corporators served show-cause notices for backing BJP : पक्षशिस्तीचे उल्लंघन; सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश

Akola ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन करून भाजप समर्थित गटाला सहकार्य व समर्थन दिल्याच्या आरोपावरून अकोट नगर परिषदेतील पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक हाजी मो. युसुफ पुंजानी यांनी दिली आहे. नोटीस प्राप्त नगरसेवकांमध्ये रेश्मा परवीन मोहम्मद अजीम, युसुफ खान हादिक खान, हन्नान शाह सुलतान शाह, दिलशाद बी. रज्जाक खान आणि अफरीन अंजुम मो. शरफोद्दिन यांचा समावेश आहे.

एमआयएम पक्षाच्या वतीने उमेदवारी देताना संबंधित नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, ध्येय व धोरणे मान्य करून लेखी आदेश देण्यात आले होते. या आदेशांनुसार भाजप किंवा भाजप समर्थित कोणत्याही गटासोबत जाणे, सहकार्य करणे अथवा समर्थन देण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. यापूर्वी दिलेले कोणतेही समर्थन तात्काळ मागे घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

Amravati Municipal Corporation Election : स्थलांतरित मतदारांचा शोध; उमेदवारांची प्रचार यंत्रणा सक्रिय

मात्र उपलब्ध माहिती व नोंदींनुसार संबंधित नगरसेवकांनी भाजप समर्थित उमेदवार किंवा गटाला स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समर्थन व सहकार्य केल्याचा आरोप आहे. ही कृती पक्षाच्या अधिकृत आदेशांचे उल्लंघन असून पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी

तसेच ही बाब महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८७ अंतर्गत पक्षविरोधी कृत्य ठरू शकते, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास पक्षीय कारवाईसह अनर्हतेची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.