new-vehicles-for-new-committee-chairpersones-in-akola-municipal-corporation : अकोला मनपात पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांचा मारा
Akola तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर अकोला महानगरपालिकेत भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होताच आता वाहन सुविधांचा विषय चर्चेत आला असून, नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशासनाकडून भाडेतत्त्वावर नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
महापौर शारदा रणजित खेडकर यांच्यासाठी अत्याधुनिक इनोव्हा हायक्रॉस वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अकोला महानगरपालिका आयुक्तांकडेही इनोव्हा हायक्रॉसचे बेसिक मॉडेल वाहन आहे. उपमहापौर अमोल गोगे यांना बोलेरो वाहन देण्यात आले आहे.
ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट
दरम्यान, २ मार्च रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार असून, स्थायी समितीत भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने हे पद भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. नव्याने निवड होणाऱ्या १८ व्या स्थायी समिती सभापतींनाही नवीन वाहन उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतींसह सभागृह नेते पवन महल्ले, विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, महिला व बालकल्याण समिती सभापती, तसेच शहरातील चारही झोन सभापतींनाही वाहन सुविधा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पदाधिकाऱ्यांकडून वाहनांची मागणी वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Nitin Gadkari : अमरावतीच्या आर्थिक विकासाचा मेट्रोमार्ग कागदी रूळावर रखडला
महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता नवीन वाहने खरेदी करणे शक्य नसल्याने, ही सर्व वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी विविध खासगी संस्थांकडून वाहन उपलब्धतेबाबत माहिती मागविण्यात आल्याचे समजते.








