Akola Municipal Corporation : ८ जागांसाठी ५० इच्छुक; ८७ नामनिर्देशनपत्रांचे वितरण

87-nomination-forms-for-8-posts : अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी चुरस,९ मार्चला मनपाच्या दोन सर्वसाधारण सभा

Akola अकोला महानगरपालिकेत स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या आठ पदांसाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. २ मार्च २०२६ पासून नगर सचिव कार्यालयातून नामनिर्देशनपत्रांचे वितरण सुरू झाले असून आतापर्यंत ५० इच्छुकांना एकूण ८७ नामनिर्देशनपत्रे देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

स्वीकृत सदस्य पदासाठी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. अनेक इच्छुकांनी एकापेक्षा अधिक संच घेतल्याने वितरित नामनिर्देशनपत्रांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.

नामनिर्देशनपत्रे ६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करणे आवश्यक असून अंतिम मुदतीनंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत सदस्य निवडीकडे सध्या राजकीय वर्तुळासह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Rajya Sabha Election : एकनाथ शिंदेंनी साधला ‘सोशल बॅलन्स’, दलित चेहऱ्याला संधी

अकोला महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, ९ मार्च रोजी दोन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या दोन्ही सभा होणार आहेत. पहिली सभा सकाळी ११ वाजता होणार असून त्यात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यासह महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

पहिल्या सभेत महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ अंतर्गत आठ स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय आहे. तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर महानगरपालिकेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्याचाही विषय आहे.

Ajit Pawar accident : अजित पवारांच्या अपघातावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम

दुसरी सभा दुपारी १२ वाजता होणार असून यात शहर विकासाशी संबंधित महत्त्वाचे विषय आहेत. शहरातील मोठ्या नाल्यांची सर्वंकष साफसफाई करण्यासाठी नियोजनावर चर्चा व निर्णय, प्रभागनिहाय कचरा वाहतुकीसाठी मालवाहू गाड्या (टायरसह) खरेदी करणे, तसेच शहरातील सर्व प्रकारच्या मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्यावरही चर्चा होणार आहे. शहरातील स्वच्छता, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, कचरा व्यवस्थापन आणि मोकाट जनावरांच्या समस्येमुळे वाढणारी वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका लक्षात घेता या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.