Akola Municipal Corporation : अकोल्यात थकबाकीदारांना दिलासा; ‘शास्ती अभय’ योजना आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग!

akola-municipal-corporation-property-tax-amnesty-scheme-encroachment-drive : मालमत्ता कराच्या थकबाकीवर दंडमाफीसाठी मनपाचा पुढाकार; हॉकर्स झोनचे नियोजन आणि मुख्य रस्ते मोकळे करण्याचे आयुक्तांचे आदेश

Akola अकोला शहराच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि नागरिकांवरील करांचे ओझे कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता ‘ॲक्शन मोड’ स्वीकारला आहे. थकीत मालमत्ता करधारकांसाठी ‘शास्ती अभय योजना’ (दंड माफी) लागू करण्यासोबतच शहरात वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिले आहेत. यासंदर्भात गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या दालनात एक विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

अकोला महानगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराची मोठी थकबाकी साचली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आणि सर्वसामान्य मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. थकबाकीवरील दंडाची रक्कम (शास्ती) माफ करून मूळ कर भरण्याची संधी देण्यासाठी ‘शास्ती अभय योजना’ राबवण्याचे नियोजन आहे. मालमत्ता धारकांना घरबसल्या कर भरणे सोपे व्हावे, यासाठी ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम केली जाणार आहे.

Zilla Parishad Elections : चिखलीत ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपची तटबंदी; ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता!

शहरातील मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, मनपा आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला नवीन आदेश दिले आहेत. मुख्य मार्गावरील फिरत्या विक्रेत्यांना मनपाने तयार केलेल्या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करून रस्ते मोकळे केले जातील.

Chandrapur Municipal Corporation : नगरसेवक सांभाळता आले नाहीत; अंतर्गत गोंधळानेच चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा खेळ खल्लास

अतिक्रमण हटवण्यासाठी प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार असून, ही कारवाई आता नियमितपणे सुरू राहील. महानगरपालिकेच्या आवार भिंती लगतचे अतिक्रमण काढून त्या जागेवर झाडे लावून सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकोला शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी आणि पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास अकोल्याच्या नागरी सुविधांमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे.