shivsena-ubt-aggressive-on-Mosquito infestation : जलकुंभी हटविण्यासाठी आक्रमक पवित्रा; उपायुक्तांसोबत चर्चा
Akola अकोला शहरात डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येच्या निराकरणासाठी शिवसेना शहराच्या वतीने मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उपायुक्त (आरोग्य व प्रशासन) विजय पारतवार यांच्यासोबत शिवसेना महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
शहरातील हरिहर पेठ, अक्कलकोट परिसर, जयराम सिंग प्लॉट, गुरुदेव नगर, मारुती नगर, शिवसेना वसाहत, गाडगे नगर, गीता नगर तसेच जुना शहर भागात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना घरात बसणेही कठीण झाले आहे.
यावेळी मोर्णा नदी तसेच विविध नाल्यांमध्ये साचलेल्या जलकुंभीमुळे मच्छरांची वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सध्या जलकुंभी काढण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने ते तातडीने वेगाने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. अधिक यंत्रणा लावून हे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंतीही करण्यात आली.
उपयुक्त विजय पारतवार यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, येत्या १० ते १५ दिवसांत मोर्णा नदी, रमाबाई नगर नाला तसेच शिवसेना वसाहत समोरील नाल्यातील जलकुंभी हटविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, ठरलेल्या कालावधीत मच्छरांचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेऊन प्रभावी निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.








