MLA Dr. Nitin Raut attended Alcoholics Anonymous Convention : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विविध राज्यांतील सदस्य झाले सहभागी
Nagpur : व्यसनमुक्तीचा संदेश देणारे आणि दारूच्या विळख्यातून बाहेर पडण्याक इच्छुक असलेल्या लोकांसाठी आधारस्तंभ ठरलेले अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस या संस्थेचे दोन दिवसीय संमेलन नागपुरात उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केले. अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमसच्या या समाजोपयोगी चळवळीला त्यांनी जाहिरपणे पाठिंबा दर्शवला.
या संमेलनात क्लास ट्रस्टी जीएसबी इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पवार आणि सहाय्यक कामगार आयुक्त प्रतिभा भाकरे यांच्यासह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा आणि गोवा या राज्यांतील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारूच्या व्यसनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना नव्या आयुष्याची दिशा देणे, त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणे आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे, हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते आणि यामध्ये अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस ही संघटना यशस्वी झाली.
Sandip Joshi : देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ स्वप्नं २५ वर्षांनंतर झालं साकार !
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ‘दारूचे व्यसन हे केवळ आरोग्याचाच शत्रू नाही, तर कुटुंब आणि समाजाचाही शत्रू आहे. व्यसनमुक्त होण्यासाठी अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस सारख्या संघटनांचे योगदान अमुल्य आहे. समाजाने अशा चळवळींना हातभार लावला पाहिजे.’ संमेलनात आलेल्या सदस्यांनी आपआपले अनुभव मांडले. कशा प्रकारे अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमसच्या मदतीने त्यांनी दारूपासून स्वतःला मुक्त केलं आणि नव्या जीवनाकडे वाटचाल सुरू केली, हे त्यांनी सांगितले. संघटनेचे स्वयंसेवक कोणतेही शुल्क न घेता व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन, गटचर्चा आणि मानसिक आधार देतात.
New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस ही संस्था कोणत्याही धार्मीक, राजकीय किंवा व्यावसायिक हेतूने कार्य करत नाही. तर दारूपासून मुक्त, निरोगी आणि आनंदी समाज घडवणे, हेच संस्थेचे एकमेव ध्येय आहे. दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप सामूहिक शपथविधीने झाला. ज्यामध्ये सर्व सहभागी सदस्यांनी व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांनाही या चळवळीत सामील करण्याची शपथ घेतली. ‘दारू नाही समाधान, व्यसनमुक्तीचं जीवन हाच खरा उत्सव आहे’, हा संदेश या संमेलनाने दिला.








