11 Candidates nomination papers rejected during scrutiny : महानगरपालिका निवडणूक अधिक उत्कंठावर्धक; अर्ज छानणीत ११ उमेदवारांचे अर्ज अवैध
Amravati महानगरपालिका निवडणूक दिवसेंदिवस अधिक उत्कंठावर्धक ठरत आहे. सुरुवातीपासूनच मतभेद, रोष, आक्षेप आणि वाद चव्हाट्यावर आले असून, उमेदवारी अर्ज छानणीच्या टप्प्यावरही तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी (३१) झालेल्या अर्ज छानणीदरम्यान सहा झोनमधील (निवडणूक केंद्र) एकूण ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
झोन क्रमांक ७ मधील एका उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल करण्यात आल्याने त्या झोनमधील वैध व अवैध अर्जांबाबतचा निर्णय रात्री उशिरापर्यंत प्रलंबित राहिला. झोन क्रमांक १, रामपुरी कॅम्प येथे एकूण ११८ उमेदवारांपैकी दोघांचे अर्ज अवैध ठरले, तर ११६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. संबंधित दोन्ही उमेदवारांनी अनामत रक्कम भरली नसल्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
झोन क्रमांक २, नवीन तहसील कार्यालय केंद्रात दाखल झालेल्या १२९ उमेदवारी अर्जांपैकी १२८ अर्ज वैध ठरले, तर एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे हा अर्ज अवैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, झोन क्रमांक ७ (निवडणूक कार्यालय क्र. ७) अंतर्गत प्रभाग क्रमांक १९, साईनगर येथील भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप दाखल केला आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिकेचा कंत्राटदार असलेल्या व्यक्तीस उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. सचिन भेंडे यांनी मनपाचे दोन कंत्राट घेतले असल्याचा दावा करत, ते १६ रोजी परवाने परत करणार असल्याचे लिखित आश्वासन दिले असले तरी तोपर्यंत संबंधित कंत्राटातील कामे पूर्ण होणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
municipal elections : ‘भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर, राजकारणाची हास्यजत्रा
एकाच वेळी दोन लाभाची पदे उपभोगता येणार नाहीत, असा लिखित आक्षेप तुषार भारतीय यांनी बडनेरा झोन क्रमांक ७ च्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. या प्रकरणी दोन्ही उमेदवारांची बाजू ऐकून घेण्यात आली असून, रात्री १० वाजेपर्यंत अंतिम निर्णय न झाल्यामुळे या झोनमधील किती उमेदवारांचे अर्ज वैध व अवैध ठरले, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.








