Amravati Municipal Corporation : अमरावती महापौर निवडणूक आठवडाभर लांबली; गट नोंदणीला दिलासा

Amravati mayoral election postponed by a week : सुटीनंतरही मंगळवारी एकही गट नोंदणी प्रस्ताव दाखल नाही

Amravati अमरावती महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ३० जानेवारीऐवजी आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची गट नोंदणीसाठीची घाई काहीशी कमी झाली असून, तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी एकही गट नोंदणी प्रस्ताव दाखल झाला नाही.

निवडणुकीस विलंब झाल्याने तसेच गट नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्यामुळे राजकीय पक्षांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परिणामी, मंगळवारी कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा अपक्ष नगरसेवकांनी गट नोंदणीसाठी दावा सादर केला नाही.

मंगळवारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गट नोंदणीचे प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात यापैकी कोणत्याही पक्षाने दावा दाखल केला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते अविनाश मार्डीकर यांनी गट नोंदणीविषयी सविस्तर माहिती घेतली असून, येत्या एक-दोन दिवसांत दावा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक, आलिशान गाड्यांची आवड !

अमरावती महानगरपालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपचे सर्वाधिक २५ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाचे प्रत्येकी १५, एमआयएमचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ११, बहुजन समाज पार्टीचे ३, शिवसेनेचे (शिंदे गट) ३, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) २ आणि वंचित बहुजन आघाडीचा १ नगरसेवक आहे. येत्या काही दिवसांत काही नगरसेवक परस्पर ताळमेळ साधून किंवा स्वतंत्रपणे गट नोंदणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Demand for Girish Mahajan’s resignation : गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचे नाव वगळले!

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आणि युवा स्वाभिमान पक्षाने यापूर्वी दाखल केलेले गट नोंदणी प्रस्ताव मंगळवारी मंजूर करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांची ओळख पटवून गट नोंदणीस मान्यता दिली असून, यासंदर्भातील पत्र तत्काळ महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. शिवसेना (शिंदे गट) तर्फे डॉ. राजेंद्र तायडे यांनी, तर युवा स्वाभिमान पक्षाकडून गटनेते नाना आमले यांनी गट नोंदणीसाठी अर्ज दाखल केला होता.