BJP–Shiv Sena–Yuva Swabhiman coalition intact, but seat allocation remains stuck : स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू; अधिकृत घोषणा नाहीच
Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची युती होणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जागावाटपावरून अद्यापही एकमत न झाल्याने युतीचे चित्र धूसरच आहे. शिवसेनेकडून प्रत्येक प्रभागात एक जागा देण्याचा नवा प्रस्ताव मांडण्यात आल्याने जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम आहे. तरीही भाजप 45 ते 50 शिवसेना 18 ते 20 तर युवा स्वाभिमान पार्टी 9 ते 12 जागांवर लढेल, असे ठरल्याचे सूत्रांकडून कळते.
अमरावतीतील एका नामांकित हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे नेते तथा जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रीती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आदी उपस्थित होते. भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, किरण पातुरकर, नितीन गुडधे यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून महायुतीत २५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, भाजपच्या कोअर कमिटीसोबत झालेल्या चर्चेत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यापूर्वी नागपुरातही जागावाटपावर बैठक झाली होती. आता अमरावतीत सलग चर्चांचा सिलसिला सुरू असला तरी निर्णय पुढे ढकलला जात असल्याचे चित्र आहे.
जागावाटपावरून युतीत मतभेद वाढत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही राजकीय निरीक्षकांकडून युती फिस्कटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत पातळीवर तसा कोणताही संकेत देण्यात आलेला नाही. त्यामुळे युतीचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune Municipal Corporation Elections : शिवसेनेच्या बैठकीत खळबळ; पुणे शहरप्रमुख रागातच पडले बाहेर
“आमची युती ही केवळ भाजप आणि शिंदेसेनेपुरती मर्यादित आहे. मागील निवडणुकीत आमच्या विरोधात उमेदवार उभे करून चुकीचा पायंडा पाडण्यात आला होता. पुन्हा तसे झाले, तर युती पाळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.
माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी गत विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत, युती धर्म पाळण्यात आला नसल्याचा आरोप केला. पुढे त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, यापुढे आमच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करण्यात आले, तर आम्हीही प्रत्युत्तरादाखल उमेदवार देऊ. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळणे हा युतीचा मूळ हेतू होता. मात्र, चुकीच्या पद्धतीने उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न झाल्यास युतीला अर्थ उरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला युतीत सामावून घेण्याच्या चर्चेमुळे तणाव वाढल्याचे स्पष्ट होत असून, युती प्रत्यक्षात होणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








