
BJP-shrichand-tejwani-elected-amravati-mayor: सत्तासंघर्षात भाजप-राष्ट्रवादी-स्वाभिमानीची युती यशस्वी, एमआयएममध्ये फूट
Amravati अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय समीकरणे बाजूला सारत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे श्रीचंद तेजवानी यांनी ५५ मते मिळवून महापौरपदावर नाव कोरले असून, काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांचा मोठा पराभव केला.
शिरभाते यांना केवळ १६ मते मिळाली. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षाने सत्तेसाठी एकत्र येत महायुतीची ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे, एमआयएममध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले; पक्षाच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी पक्षादेश झुगारून महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Nagpur Municipal Corporation : भाजपच्या नीता ठाकरे नागपूरच्या महापौर!
निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंवाद दिसून आला होता. भाजप, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी पक्ष सुरुवातीला स्वतंत्रपणे लढल्याने युती होणार की नाही, याबाबत साशंकता होती. प्रचारादरम्यान भाजप आणि स्वाभिमानीमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते, तसेच माजी खासदार नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबतही चर्चा रंगल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांनीही स्वाभिमानीला सोबत घेण्यावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सत्ता राखण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवून हे तीनही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसचे महापौरपदाचे स्वप्न उधळून लावले.
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध जाण्याची शक्यता
८७ सदस्य संख्या असलेल्या अमरावती महापालिकेत श्रीचंद तेजवानी यांच्यासह उपमहापौरपदाचे उमेदवार स्वाभिमानीचे सचिन भेंडे यांनाही ५५ मते मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते पडली, तर बसपाचे सचिन वैद्य यांना ३ मते मिळाली.
एमआयएमचे एकूण १२ सदस्य सभागृहात असूनही मीरा कांबळे यांच्या बंडखोरीमुळे पक्षाची नाचक्की झाली आहे. महायुतीच्या या विजयामुळे अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची पकड अधिक मजबूत झाली असून, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.








