Bawankule Slams Rana over Alliance : नैसर्गिक युतीचा प्रस्ताव राणांनीच धुडकावला; अमरावती विकासासाठी भाजपचा ‘व्हिजन २०२७’ जाहीर
Amravati “कोणी कितीही मोठा असला, तरी तो पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हापेक्षा मोठा नाही. युवा स्वाभिमान पक्षाशी भाजपचा आता कोणताही संबंध उरलेला नाही,” अशा स्पष्ट शब्दांत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांच्या मैत्रीपूर्ण लढतीच्या दाव्याला छेद दिला. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा वचननामा प्रसिद्ध करताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री बावनकुळे यांनी युती फिस्कटण्यामागची कारणे स्पष्ट केली. सुरुवातीला ६ आणि नंतर ९ जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आमदार रवी राणा यांनी ३५ हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले. शिंदेसेना आणि युवा स्वाभिमान अशा दोन्ही पक्षांशी युतीसाठी प्रयत्न झाले, मात्र जागांच्या अवास्तव मागणीमुळे नैसर्गिक युती होऊ शकली नाही. आता कोणताही संभ्रम नाही. भाजपचे पदाधिकारी केवळ भाजपच्याच उमेदवारांसाठी काम करतील. ज्यांनी कमळाविरोधात उमेदवार दिले, त्यांच्याशी आता कसलीही मैत्री नाही, असेही ते म्हणाले.
बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि इतर नेत्यांना कडक शब्दात बजावले की, “भाजप उमेदवारांविरोधात काम करणारा कोणताही नेता असो, पक्ष त्याला सहन करणार नाही. आता घोडा मैदानात उतरलेला आहे, त्यामुळे सर्वांनी केवळ कमळाच्या विजयासाठी झोकून द्यावे.”








