Amravati Municipal Election 2026 : भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन; अमरावतीत बंडाळी मोडून काढण्यासाठी भाजपचा बडगा

BJP suspends 15 rebel office-bearers for six years : पालकमंत्र्यांचा सलग दुसरा झटका; राणांशी युती तोडल्यानंतर आता स्वकीयांवरही कठोर कारवाई

Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षशिस्त मोडणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या आपल्याच १५ पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भाजपचे सदस्य असूनही पक्षाच्या निर्णयाला आव्हान देत इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या या बंडखोरांचे पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कठोर कारवाई केली असून, यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पक्षाने दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, या १५ पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या संविधानातील मूळ तत्त्वांना हरताळ फासला आहे. अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे आणि स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणे या कृतींमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनात्मक मूल्यांचा भंग झाला आहे.

Ladki Bahin Yojana : भाजपकडून काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पत्राची होळी

कार्यकर्त्यांना शिस्तीचा कडक संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. अमरावती महापालिकेत भाजपचे एकूण ७३ उमेदवार (६८ अधिकृत व ६ समर्थित) रिंगणात असून, त्यांना या बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

भाजपविरोधात युवा स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने खालील १५ जणांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये विवेक चुटके, ज्योती वैद्य, गौरी मेघवानी, किशोर जाधव, अनिषा मनीष चौबे, सचिन पाटील, संजय वानरे, सतीश करेसिया, शिल्पा पाचघरे, दीपक गिरोळकर, योगेश वानखडे, मेघा हिंगासपुरे, संजय कटारिया, रश्मी नावंदर आणि धनराज चक्रे यांचा समावेश आहे.

Asaduddin Owaisi : ओवेसींच्या दोन सभांनंतर एआयएमआयएम आक्रमक; काँग्रेसची पारंपरिक मते धोक्यात!

अमरावतीच्या राजकारणात मागील ४८ तासांत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. शनिवारीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबतची महापालिकेतील युती तोडण्याची घोषणा केली होती. राणा यांनी युतीधर्माचे पालन न केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांच्याविरुद्धच्या जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर लगेचच रविवारी पक्षांतर्गत बंडखोरांचे निलंबन करून बावनकुळे यांनी आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले आहेत.

या सलग दोन मोठ्या निर्णयांमुळे अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आता एकला चलो रे च्या भूमिकेत दिसत असली, तरी अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात पक्षाला कितपत यश येते, हे १५ जानेवारीच्या मतदानानंतरच स्पष्ट होईल.