abvp-stage-protest-in-senate-meeting-sant-gadgebaba-amravati-university : विद्यार्थी हिताचे प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप
Amravati संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सभेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांनी थेट सभागृहात प्रवेश करून कामकाज ठप्प केले. विद्यार्थी हिताच्या विविध प्रश्नांवर प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.
विद्यापीठाच्या ‘प्रवेश, परीक्षा आणि निकाल’ या तिन्ही आघाड्यांवर प्रशासन अयशस्वी ठरल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. विद्यापीठाच्या ४२ वर्षांच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची चर्चा यावेळी झाली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पाऊण तास सभागृहात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, ‘नुटा’ समर्थित सदस्य प्रा. कैलास चव्हाण आणि भय्यासाहेब मेटकर यांनी अभाविपच्या घोषणाबाजीला आक्षेप घेत ती थांबवण्याची मागणी केली.
Koradi Power project : कोराडी वीज प्रकल्पात मोठा अनर्थ टळला, चार कामगार थोडक्यात बचावले
अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किन्नाके आणि विभाग संघटन मंत्री योगेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काही महिन्यांपूर्वी मांडलेल्या मागण्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. पीठासीन सभापती तथा कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सर्व सिनेट सदस्यांसमोर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
कुलगुरूंनी त्यांच्या दालनात चर्चा करण्याची तयारी दर्शवली; मात्र अभाविप पदाधिकाऱ्यांनी सभागृहातच चर्चा करण्याचा आग्रह धरला. अखेर कुलगुरूंना सभागृहातच चर्चा करावी लागली. त्यानंतर अभाविपने आपल्या मागण्या मुद्देसूद मांडल्या; मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
या चर्चेत कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, माजी संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर सहभागी झाले होते. सुमारे पाऊण तास चाललेल्या चर्चा-प्रतिचर्चेनंतरही आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृह सोडले.
ladki bahin yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी पडताळणी मोहीम
दरम्यान, अभाविपचे आंदोलन संपल्यानंतर युवक काँग्रेसचे वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआय आणि एआयएसएफच्या पदाधिकाऱ्यांनीही सिनेट सभागृहात येत आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणे चुकीचे नाही; मात्र अभाविपच्या आंदोलनामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप त्यांनी केला.








