“पुण्यात Another land scam : आणखी एक जमीन घोटाळा! कृषी विभागाची ५ एकर जमीन हडप !

Crime against 9 people including Tehsildar, Tejwani, Patil in trouble again : तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा, तेजवानी, पाटील पुन्हा अडचणीत”

Pune: पुण्यात एकामागून एक जमीन घोटाळे उघडकीस येत असून, प्रशासन आणि यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहाराचा तपास सुरू असतानाच आता कृषी विभागाशी संबंधित आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात थेट सरकारी जमिनीचा अपहार केल्याचं उघड झालं असून, तहसीलदारांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील बोपोडी परिसरात कृषी विभागाच्या ताब्यात असलेली तब्बल पाच एकर जमीन गैरमार्गाने खाजगी नावे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही जमीन १८८३ पासून कृषी खात्याकडे होती. शासनाच्या ताब्यात आणि वहिवाटीत असतानाही या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी मिळवण्याचा प्रयत्न झाला. मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदींना धाब्यावर बसवून हा गैरप्रकार करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.

Pune land scam: १ टक्के शेअरधारकावर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही?

या जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या व्यवहारात आधीच गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा या प्रकरणाशीही संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शीतल तेजवानीने यापूर्वीच बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेतून तब्बल ४१ कोटी रुपयांचे कर्ज काढून इतरत्र गुंतवले होते. या प्रकरणात तिच्या पती सागर सूर्यवंशीला सीआयडी आणि ईडीने अटक केली होती, तर शीतलने अटकपूर्व जामीन मिळवला होता.

या नव्या जमीन घोटाळ्याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रविण चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या कालावधीत हा अपहार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा पुण्यातील जमीन माफियांचा कारभार उघड झाला आहे. सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याइतका मोठा गैरप्रकार राजकीय वरदहस्ताशिवाय होऊ शकत नाही, असा सूर नागरिकांमध्ये आहे. एकीकडे टोळी युद्धाने त्रस्त झालेल्या पुणेकरांची झोप उडाली होती, तर आता वाढत्या जमीन घोटाळ्यांनी नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.

Local Body Elections : लोणारमध्ये भाजपचे ‘एकला चलो रे’, कार्यकर्त्यांमध्ये आनंद

विरोधकांनी शीतल तेजवानी आणि तिच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिच्या हाती किती आणि कुठल्या सरकारी जमिनींचे बनावट व्यवहार झाले आहेत, हे उघड करणे आवश्यक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पुण्यातील या सलग दोन जमीन घोटाळ्यांमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.