Anup Dhotre : भुसावळ–वर्धा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Cabinet Approves Third and Fourth Railway Lines on Bhusawal–Wardha Route : मुंबई–हावडा मार्गावरील ताण कमी होणार; अतिरिक्त गाड्यांचे संचालन शक्य

Akola महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भुसावळ–वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई–हावडा या देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. शिवाय अतिरिक्त प्रवासी गाड्यांचे संचालन शक्य होईल. नवीन गाड्या सुरू होण्यासाठी आणि प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठीही या प्रकल्पामुळे गती मिळेल. दळणवळणाच्या सुविधेतही मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

भुसावळ–वर्धा या मार्गाची एकूण लांबी ३१४ किलोमीटर आहे. या प्रकल्पावर अंदाजे ₹९,१९७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मार्गावर ७२ रोड ओव्हर/अंडर ब्रिज आणि एक रेल ओव्हर रेल ब्रिज उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा लाभ जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यांना होणार आहे. वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे होणारा अडथळा कमी होऊन गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होईल. तसेच पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

Sant Gadge Baba Amravati University : अकोल्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र?

पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून, ४५ कोटी किलो CO₂ उत्सर्जनात घट होणार आहे. ही घट म्हणजे सुमारे १.८ कोटी झाडे लावल्याइतकी परिणामकारक ठरेल, असे रेल्वे खात्याचे म्हणणे आहे. या निर्णयाबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे आभार मानले आहेत. तसेच आपले सहकारी आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे आणि वसंत खंडेलवाल यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Randhir Sawarkar : ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीचा कालावधी वाढवा

“या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर अधिक सक्षम होईल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला.