Political controversy erupts over Khamgaon Agricultural Produce Market Committee : १४ नोव्हेंबरला सभापती पेसोडे यांच्यावरील अविश्वास ठरावावर विशेष सभा
Khamgao खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर (कृबास) पुन्हा एकदा राजकीय वादळ उठले आहे. सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा ठराव १८ विरुद्ध १२ संचालकांनी दाखल केला असून, या हालचालीमुळे स्थानिक राजकारणात राणा विरुद्ध नाना असे नवे समीकरण उभे राहिले आहे.
अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांमध्ये विविध पक्षांचे संचालक आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील भाजपाचेही या ठरावाला अप्रत्यक्ष समर्थन असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या पुढाकाराने अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
Vidarbha Farmers : सरकारचे दुर्लक्ष, संग्रामपूर तालुक्याला न्याय द्या!
सभापती पेसोडे यांच्या दैनंदिन कारभारात अनियमितता, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी ठराव दाखल केला आहे. ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या या ठरावावर १४ नोव्हेंबरला चर्चा होणार आहे.
खामगाव कृबास ही केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर विदर्भातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बाजार समित्यांपैकी एक आहे. त्यामुळे येथे सत्तासमीकरण बदलले की राजकीय लाट निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे वर्चस्व या कृबासवर राहिले. परंतु सभापती पेसोडे यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय गोटे पुन्हा हलले.
काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “सभापतींच्या कार्यपद्धतीवर असमाधान असल्याने सर्वपक्षीय संचालकांनी ठराव दाखल केला आहे. त्यामुळे हा ठराव निश्चितच पारित होईल.”
मात्र, दुसरीकडे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अविश्वास ठराव दाखल झाला म्हणजे तो पारित होईलच असे नाही. अनेकदा विरोधकांनी प्रयत्न केले, पण सत्ता राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता पुढे काय होते, ते पाहूया.”
Local Body Elections : नगर पालिकांसाठी केवळ चार दिवस मिळणार प्रचाराला
या अविश्वास ठरावानंतर सोशल मीडियावर विविध व्हिडीओ आणि संदेश व्हायरल होत असून, स्थानिक भाजप नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबरच्या विशेष सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे, तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खामगाव कृबासवरील अविश्वास ठरावाने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. “राणा विरुद्ध नाना” अशी रंगलेली ही लढत आता विदर्भाच्या राजकीय नकाशावर नवा अध्याय लिहिण्याची शक्यता निर्माण करते.








