Suspense on Appointment of Guardian Minister : अख्ख्या राज्याला पालकमंत्र्यांच्या घोषणेची प्रतिक्षा
Nagpur राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रीपदाची प्रतिक्षा आहे. अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठवड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे घोषित होतील, असा दावा केला होता. मात्र अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही.
आता यात परत तारीख पे तारीख असे चित्र निर्माण झाले असून आता १५ जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. अगोदर मुख्यमंत्रीपद, मग खातेवाटप व आता पालकमंत्रीपदासाठी राज्याला इतकी प्रतिक्षा करावी लागते आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे की नाही, असा सवालच राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
CM Devendra Fadnvis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत
पालकमंत्रीपदाबाबत तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती व १५ ते १६ जानेवारीपर्यंत निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरदेखील टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कुठलाही अजेंडा नव्हता व लोकहिताचे कुठलेही धोरण नव्हते, असे ते म्हणाले.
केवळ भाजप व महायुतीचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ते वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. आम्ही मात्र एकत्रित असू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी भाजप तयारीत आहे. आमचा पक्ष कधीही निवडणूकीला सज्ज असतो.
उद्यादेखील निवडणूक लागली तरी आमची तयारी आहे. त्यामुळे वेगळ्या तयारीची गरज नाही. या निवडणूकीत महायुती राज्यात क्रमांक एकवरच असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपकडून सदस्यता नोंदणीवर भर देण्यात येत आहे. दीड कोटी सदस्यसंख्येचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांत ही संख्या गाठण्यात यश येईल. त्यानंतर बुथप्रमुख, तालुकाअध्यक्ष, जिल्हाअध्यक्षांची निवड करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे








