Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the administrative building on Sunday : प्रशासकीय इमारतीचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
Wardha : आर्वी येथील अपर वर्धा कॉलनीलगत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. पण गेल्या चार वर्षांपासून या इमारतीच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. अखेर आता मुहूर्त सापडला असून येत्या १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
सुसज्ज अशा इमारतीतून उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाचे कामकाज आता सुरू होणार आहे. येथील जुन्या इमारतीमध्ये नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यानाही त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही, पाण्याचीही पुरेशी सोय नाही. विविध विभागांना स्वतंत्र कार्यालय नसल्याने एकाच ठिकाणाहून सर्व कामकाज चालत होता.
CM Devendra Fadnavis : प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग संशोधन केंद्र!
पावसाळ्यात इमारतीला गळती लागून शॉर्टसर्किटचाही धोका निर्माण झाला होता. साडेचार ते पाच वर्षांपूर्वी अचानकपणे तहसील कार्यालयाला आग लागली होती. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. ही इमारत वर्ष १९३५ मधील आहे. याच परिसरात उपविभागीय कार्यालयही आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढायला लागली होती. यातून काम करणे अडचणीचे ठरत होते.
अडचण लक्षात घेता आमदार सुमीत वानखडे, आमदार दादाराव केचे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून नवीन प्रशासकीय इमारत साकारली. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला. पण कामकाज सुरू होऊ शकले नाही. आता १३ एप्रिलला ही प्रशासकीय इमारत कामकाजाकरिता खुली होणार, अशी माहिती प्राप्त झाली आहे. नवीन इमारतीच्या लोकार्पणाची प्रतीक्षा असतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज या नवीन इमारतीतून पार पडले.
CM Devendra Fadanvis : मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे पैसेच नाहीत, पाच लाख उधार द्या, FD करतो!
उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे कामकाज आता नियमित येथून सुरू होईल, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु त्यानंतर पुन्हा जुन्याच इमारतीतून कामकाज सुरू झाले. आता चार वर्षांनंतर मुहूर्त सापडल्याने उद्घाटनापूर्वी रंगरंगोटी, सोयीसुविधा आणि फर्निचरचे काम जोरात सुरु आहे. चार वर्षे होऊनही लोकार्पण न झाल्याने नवीन प्रशासकीय इमारत दुरुस्तीलाही आली. पण लोकार्पणाचा पत्ता नव्हता. अखेर आता तो दिवस आला आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला.
CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT
आर्वी तालुक्यात ७४ ग्रामपंचायती असून २२२ गावे आणि शहर आहे. या सर्वच गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयात यावे लागते. उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वीत असल्याने आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकही येथेच येतात. या परिसरात पुरवठा अधिकारी, निवडणूक विभाग, नाझर कार्यालय, अर्जनवीस कार्यालय, संजय गांधी योजना, नायब तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. मात्र, या सर्वांनाच जुन्या इमारतीत अडचणींचा सामना करावा लागत आहे.








