Ashok Dhawad : ३६ वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; त्या माजी आमदाराच्या वाट्याला प्रतिक्षाच!

Request-to-acquit-the-former-MLA-ashok-dhawad-who-stopped-the-Vidarbha-Express : विदर्भ एक्स्प्रेस रोखणाऱ्या माजी आमदाराला दोषमुक्त करण्याची विनंती

Nagpur एखाद्या लोकहिताच्या मागणीसाठी उत्साहाच्या भरात सरकारी यंत्रणेविरुद्ध आंदोलन करणे किती मनस्तापदायक ठरू शकते, याची प्रचीती नागपुरातील काही आंदोलकांना येत आहे. गेल्या ३६ वर्षांपासून रेल्वे न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असून, कोर्टाच्या चकरा मारताना आंदोलकांची चांगलीच दमछाक होत आहे.

ज्यांच्यावर रेल्वेने गुन्हे दाखल केले होते, त्यापैकी अनेकांचे निधन झाले असून आता केवळ मोजकेच जण उरले आहेत. यामध्ये माजी आमदार अशोक धवड यांचा समावेश असून, त्यांनी आता या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातून आम्हाला दोषमुक्त करावे, अशी विनंती पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Mumbai Municipal Council : आमदार-खासदारांना ३ वर्षांत १६०० कोटींचा निधी

ही घटना १ मे १९८८ सालची आहे. त्याकाळी नागपूरवरून मुंबईला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस रात्री १०.३० वाजता सुटायची आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईला पोहोचायची. ही वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची होती.

विदर्भ एक्स्प्रेस सायंकाळी ६.३० वाजता नागपूर स्थानकावरून सोडावी, जेणेकरून सकाळी मुंबईत पोहोचल्यावर मंत्रालयातील कामकाजासाठी पूर्ण दिवस मिळू शकेल, या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शिक्षक आमदार स्वर्गीय दिवाकर जोशी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय उमेशबाबू चौबे यांचाही सहभाग होता. आंदोलनामुळे रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला होता, तेव्हा पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

दुर्दैवाने या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, मात्र आंदोलकांना प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे लागत आहे. अशोक धवड यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, आंदोलनादरम्यान रेल्वेच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नव्हते आणि आरोपपत्रातही तसा उल्लेख नाही. शासन निर्णयानुसार, ५ लाखांच्या खाली नुकसान झाले असल्यास राजकीय व सामाजिक आंदोलनांतील गुन्हे मागे घेता येतात.

Graduates’ Constituency Election : काँग्रेसकडून १५१ मनपा उमेदवारांना मतदार नोंदणीचे ‘टार्गेट’

पोलिसांनी एकूण ४२ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते, त्यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित कार्यकर्ते आता वृद्धापकाळाकडे झुकले असून त्यांना शारीरिकदृष्ट्या न्यायालयात हजर राहणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी आंदोलन झाले, त्या दिवशीही विदर्भ एक्स्प्रेस तिच्या नियोजित वेळेतच म्हणजे रात्री १०.३० वाजता सुटली होती, त्यामुळे रेल्वेचा कोणताही खोळंबा झाला नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्हा सर्वांना या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी विनंती अशोक धवड यांनी केली आहे.