Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; एसआयटी तपासात धक्कादायक बाबी उघड

ashok-kharat-case-nashik-sit-investigation-office-findings-marathi-news : ‘अध्यात्माच्या आड अत्याचार’ संशय बळवला !

Mumbai: राज्यभरात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या तपासाला वेग आला असून त्याच्या कार्यालयातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. न्यायालयाने अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एसआयटीचे पथक पुन्हा एकदा नाशिकमधील त्याच्या फोकस प्रॉपर्टी कार्यालयात दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सखोल पाहणी करण्यात आली.

तपासादरम्यान संबंधित कार्यालयातील रचना आणि वातावरण पाहून अधिकाऱ्यांनाही संशय अधिक बळावला आहे. ज्या केबिनमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणी लहान स्पॉटलाईट्स लावण्यात आले होते आणि मागील भिंतीवर ‘ॐ’ चिन्ह होते. या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण निर्माण करून समोरच्या व्यक्तींवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कार्यालयाच्या बाहेरील भागात राष्ट्रध्वज लावण्यात आला होता, जिथे पीडित महिलांचे नातेवाईक बसवले जात होते.

Ravi Rana : अमरावती पोलिसांबद्दल काही आमदारांची नाराजी, रवी राणांकडून मात्र कौतुक

एसआयटीच्या चौकशीत अशोक खरातने स्वतःचे बचावाचे प्रयत्न सुरू ठेवले असून त्याने काही वादग्रस्त दावे केले आहेत. त्याच्या मते, त्याने केलेल्या कृती या एका विधीचा भाग होत्या आणि त्याने कोणावरही जबरदस्ती केली नाही. ‘माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला’ असेही तो चौकशीदरम्यान म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत असतानाही तो मंत्रजप करत असल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात फक्त महिलांचे शोषणच नव्हे तर अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांचीही फसवणूक झाल्याचे उघड होत आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. व्यवसायासाठी ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्ताने ते खरातच्या संपर्कात आले आणि त्यानंतर विविध धार्मिक विधींच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले. इतकेच नव्हे तर महागडी गाडी, परदेश दौरे, फार्महाऊस बांधकाम आणि फर्निचर यासाठीही जासूद यांच्याकडून खर्च करून घेतल्याचा आरोप आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे खरातकडे असलेल्या शस्त्र परवान्याची. २०१२ साली त्याला शस्त्र परवाना मंजूर झाला होता आणि २०२४ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्याच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी काही वापरलेली असल्याचे आढळले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी झाला याचा तपास सुरू आहे. प्रशासनाकडून त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Bacchu Kadu : जय श्रीराम! कब मिलेगा हिंदू किसान को दाम?

दरम्यान, अशोक खरातच्या कार्यपद्धतीबाबतही नवे तपशील समोर येत आहेत. तो कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करून लोकांना आपल्या प्रभावाखाली आणत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ग्राहकांची वैयक्तिक माहिती आधीच गोळा करून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याची यंत्रणा त्याने उभारली होती, असेही तपासात दिसून येत आहे.

या प्रकरणात पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काही जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर तसेच ग्रुप ॲडमिनवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एसआयटीकडून देण्यात आला आहे.

एकूणच, अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढत आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.