ashok-kharat-land-deal-solapur-shaktipith-highway-kalpana-kharat-missing-case : शक्तीपीठ महामार्गावर अशोक खरातची ११ एकर जमीन खरेदी
Nashik: नाशिक, शिर्डी आणि पुणे येथे मालमत्ता व्यवहारांनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही भोंदूबाबा अशोक खरात याने मोठी जमीन खरेदी केल्याचे समोर आले असून या व्यवहारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील सुमारे 4.48 हेक्टर म्हणजेच अंदाजे 11 एकर जमीन खरात कुटुंबाच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. 28 मार्च 2024 रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी नोंदवली गेली आहे.
या खरेदी व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आल्याचे खरेदीखतात स्पष्टपणे नमूद आहे. विशेष म्हणजे कळमण गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने या परिसरातील जमिनींचे भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार या भागात सध्या प्रति एकर जमीनदर साधारण 5 ते 6 लाख रुपये आहे, मात्र खरातने याच जमिनीसाठी तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर इतका दर मोजल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्यवहारामागे महामार्गाच्या संभाव्य फायद्याचा अंदाज घेऊन गुंतवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran us peace talks : इराण-अमेरिका चर्चा २१ तासांनंतर फिस्कटली, करार न झाल्याने तणाव शिगेला
दरम्यान, अशोक खरातच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून गायब झाली आहे. तब्बल दहा दिवस उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.
तपास यंत्रणेकडून तिच्या नातेवाईक, मित्रपरिवार तसेच घरगुती नोकरांची चौकशी सुरू आहे. कल्पना खरात कोणाच्या संपर्कात होती, ती सध्या कुठे लपून बसली आहे किंवा तिला कोणाचा आश्रय मिळत आहे का, या सर्व दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे असून ती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची रहिवासी आहे. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांमध्ये तिचाही सक्रिय सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत.
Nagpur congress : नागपूर काँग्रेसमध्ये ‘सृजन’वरून राडा; हायकमांडच्या दूतासमोरच कार्यकर्त्यांचा संताप
या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून जमीन खरेदी, आर्थिक व्यवहार आणि फरार पत्नी या सर्व बाबींचा एकत्रित तपास सुरू आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








