Ashok kharat case : रुपाली पाटील-ठोंबरेंच्या ‘फरार’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ashok-kharat-case-rupali-chakankar-controversy-rupali-patil-post-nashik-crime-news : अशोक खरात प्रकरणाने खळबळ; रुपाली चाकणकर अडचणीत

Nashik : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आता रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तथाकथित अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख असलेल्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे. यासोबतच विविध कार्यक्रमांमध्ये दोघांचे एकत्र फोटोही समोर आल्याने चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षातीलच नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने मोठी खळबळ उडवली आहे. “रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली…” अशी पोस्ट करत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली असून या पोस्टची राज्यभर चर्चा सुरू आहे.

Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाचा जागतिक बाजारावर भीषण परिणाम; तेलदर झेपावले

या प्रकरणावर बोलताना रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा विषय कोणत्याही पक्ष किंवा जातीपुरता मर्यादित नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर या पदावर असताना पोलीस कारवाईवर परिणाम झाला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात समोर आलेल्या ५८ व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांवर अत्याचार झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तपासावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच, हा विषय सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगत, चाकणकर यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे.

दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. १८ मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. तो सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे.

Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

गेल्या काही वर्षांत कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरातकडे अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक मार्गदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि अटकेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.