ashok-kharat-case-sanjay-raut-allegations-fadnavis-government-maharashtra-politics : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय आरोपांची ठिणगी
Mumbai : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून या प्रकरणावरून आता गंभीर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस सरकार उलथवून टाकण्यासाठी काही विधी केले जात असल्याचा खळबळजनक आरोप करत या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. त्यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले.
रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. अशोक खरात याच्यासोबत चाकणकर यांचे फोटो आणि पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी थेट मंत्र्यांवरच गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
Sanjay gaikwad : आरोग्य भरतीत कंत्राटी घोटाळा? आमदार गायकवाड यांचा दावा
राऊत यांनी आरोप केला की, शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकर यांच्या काळात शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाच्या बदल्या आणि बढत्या अशोक खरात यांच्या सल्ल्यानुसार केल्या जात होत्या. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून ही कामे पार पाडली जात होती आणि त्या काळात शिक्षण खाते प्रत्यक्षात खरात चालवत होते, असेही त्यांनी म्हटले. हिंदुत्वाच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू असून हे खरे हिंदुत्व नसल्याची टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर राऊत यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, सध्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अशोक खरात याच्या संपर्कात होते आणि त्याचा सल्ला घेत होते. दीपक केसरकर, एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे घेत त्यांनी हा आरोप केला. तसेच एकूण नऊ मंत्री या बाबाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी काही विधी सुरू असल्याचाही धक्कादायक आरोप त्यांनी केला.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरूनही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांच्यावर कठोर टीका करत त्यांना राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा असे संबोधले. त्यांनी म्हटले की, चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या पत्रातून कुठलाही पश्चात्ताप दिसत नाही. वैयक्तिक कारणांचा उल्लेख करत त्यांनी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला असून खरात प्रकरणात महिलांवर आणि पत्रकारांवर दबाव टाकल्याच्या आरोपांबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून या प्रकरणाचा राजकीय परिणाम पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








