व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार

विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नव्या समीकरणांची कुजबुज

Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग अखेर वाजले आहे. २१ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत २ हजार ८२५ मतदारांचा समावेश आहे. त्यातील १ हजार १०५ मतदारांच्या नोंदींवर हरकती घेण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल होणार असल्याने निवडणुकीपूर्वीच बँकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे नाव चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि तायडे यांच्यात झालेली थेट लढत अद्याप राजकीय वर्तुळाच्या स्मरणात असतानाच, आता सहकाराच्या मैदानातही दोघे आमनेसामने येणार का, याची कुजबुज सुरू झाली आहे.

एडीसीसी बँकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे तायडे यांनी बँकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्यास ही लढत केवळ सहकारापुरती मर्यादित राहणार नाही, अशी चर्चा राजकीय कट्ट्यांवर रंगू लागली आहे. मात्र, तायडे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत की समर्थकांचे पॅनल उभे करणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

पितृपक्षात कोण कोणाला पाणी पाजणार? दयाशंकर तिवारी आणि प्रफुल गुडधे पुन्हा भिडणार

दरम्यान, बँकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तायडे यांनी बँक अधिकाऱ्यांची घेतलेली झाडाझडतीही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातूनच त्यांच्या संभाव्य ‘एन्ट्री’बाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, या हालचालींचा निवडणूक लढण्याशी थेट संबंध आहे की प्रशासकीय कामकाजापुरताच हा विषय आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपत आहे. अंतिम मतदार यादी १४ ऑक्टोबरला अपेक्षित असल्याने त्यानंतरच निवडणुकीच्या मैदानातील खरे खेळाडू आणि पॅनलचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!