Breaking

Bacchu Kadu : ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, बच्चू कडू यांचे भर पावसात आंदोलन

Protest in heavy rain for farmers’ demands : पापळ येथून सुरुवात, उंबरडा बाजार गावात मुक्काम; सरकारविरोधात टाहो

Amravati “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ‘७/१२ कोरा’ यात्रेला पापळ येथून आक्रमक सुरुवात झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा सुरू झाली. रात्री उशिरा भर पावसात पदयात्रा करून बच्चू कडू व आंदोलक उंबरडा बाजार येथे पोहोचले. त्याठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. ही केवळ मोर्चा नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेले निर्णायक आंदोलन असल्याचा निर्धार यामागे असल्याचे ते म्हणाले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून सकाळी १० वाजता यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज आदी गावांमार्गे १४ जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने संपन्न होणार आहे.

Sanjay Gaikwad : गायकवाड म्हणतात, ‘मी माझे शब्द मागे घेतो’!

यात्रेत शेतकरी, महिलावर्ग, तरुण आणि प्रहार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून रस्त्यावरून घोषणा देत सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यात्रेदरम्यान आंदोलकांनी सरकारवर थेट टीका करत, “लाडकी बहीण” योजनेसाठी तातडीने निर्णय घेतला जातो, तिथे समिती लागत नाही; मग कर्जमाफी आणि ७/१२ कोरासाठी मात्र समित्या का?” असा सवाल उपस्थित केला. तातडीने निर्णय घ्या, अन्यथा संघर्ष उग्र करू, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला.

बच्चू कडू यांनी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन करताना शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आश्वासने मिळवली होती. मात्र, आजवर कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. “आम्हाला सहानुभूती नको, अधिकार हवा आहे. सातबारा कोरा झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरणारच,” असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

Pravin Datke : नागपुरात ‘आरओ’च्या नावावर दुषित पाणी!

या आंदोलनाच्या माध्यमातून पापळ येथे क्रांतीची मशाल पेटली असून राज्यभरातील शेतकरी पेटून उठले आहेत. “आता नाही तर कधीच नाही” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन शेतकरी वर्ग स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाला आहे. बच्चू कडूंनी या आंदोलनातून सरकारला थेट इशारा दिला असून शेतकऱ्यांचा दबाव आता अधिक तीव्र होत चालला आहे.