Farmers have no caste or religion, but injustice is inflicted on them : बच्चू कडू यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
Buldhana “शेतकऱ्यांना कोणताही जात किंवा धर्म नसतो, तो या जगाचा पोशिंदा असतो. मात्र, त्याच शेतकरी राजावर विश्वासघात करणाऱ्या महायुती सरकारने वेळोवेळी अन्याय केल्याशिवाय काही केले नाही,” असा रोखठोक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला. ते मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.
या जाहीर सभेला जिल्हा उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कर, संभाजी शिर्के, विलास खर्चे, अजित फंदे, शालीकराम पाटील, मानकर, अर्जुन पाटील, गजानन लोखंडकार यांची उपस्थिती होती. सभेला तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी, महिलावर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
“शेतकरी राबतो, घाम गाळतो, मात्र तरीही त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पीक विमा मंजूर होतो, पण लाभ मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवले होते. आज तेच सरकार सत्तेत असून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पायदळी तुडवत आहे,” अशी घणाघाती टीका बच्चू कडूंनी केली.
कडू म्हणाले, “एका दाण्याचा हजारो दाणे करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या जीवनात आजही अंधारच आहे. त्याच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळत नाही, त्याला नफा मिळत नाही, आणि त्याचे जीवनमान उंचावत नाही. हे सरकार मात्र डोळे झाकून गप्प बसले आहे. मी हे अन्याय गप्प बसून पाहणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि उन्नतीची पहाट उगवत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि या विश्वासघाती सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही.”
या वेळी बोलताना विलास खर्चे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्या लढ्याला ताकद देण्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भगत यांनी केले.