High court hearing on 19th June : अपात्रतेविरोधात न्यायालयात याचिका, १९ जून रोजी सुनावणी
Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्या अध्यक्ष व संचालक पदासाठी लावण्यात आलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी याचिका दाखल केली. यावर गुरुवार, १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.
तत्कालीन विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरे यांच्या न्यायालयाने बच्चू कडू यांना बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकपदासाठी अपात्र ठरविले होते. हा निर्णय सोमवार, १६ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच मंगळवारी, १७ जून रोजी कडू यांनी उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले आहे. ही माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली.
Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू गेल्या आठवड्यात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत होते. शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथूनच सोमवारी त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका स्पष्ट केली होती.
नाशिक येथील आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमएलए-एमपी विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती. याच शिक्षेचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविले. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शिवकुमार दीघे यांच्या एकलपीठाने ११ मार्च २०२५ रोजीच निलंबित केली होती.
कडू याच मुद्द्यावर आपली बाजू मांडणार असून, त्याव्यतिरिक्त काही अन्य युक्तिवादही न्यायालयात मांडले जाण्याची शक्यता आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती पानसरे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.