Demand made to cancel the relocation proposal after meeting the Railway Minister : रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी, उड्डाणपुलासाठी गडकरींचीही भेट
Amravati शहरातील रेल्वे स्थानक इतर ठिकाणी हलविण्याच्या प्रस्तावाला नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मंत्र्यांना निवेदन सादर करून, विद्यमान स्थानक कायम ठेवण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
खासदार वानखडे यांनी निवेदनात नमूद केले की, ब्रिटिशकालीन हे स्थानक अमरावतीच्या विकासाचे केंद्र आहे. ते हलविण्याचा प्रस्ताव हा काही भूमाफियांना लाभ मिळवून देण्यासाठी रचलेले कटकारस्थान आहे. रेल्वेची मौल्यवान जमीन व्यापारी प्रकल्पांसाठी मोकळी करण्याचा प्रयत्न सुरू असून, गेल्या काही महिन्यांतील घटनांवरून हा नियोजित डाव असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
Local Body Elections : मतदार यादीतील घोळ सात दिवसात सावरणार?
स्थानक परिसरात खासगी संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट, उड्डाणपुलाचे अचानक बंद करणे, दुरुस्तीला झालेला विलंब आणि त्यामुळे नागरिकांना भोगावी लागलेली गैरसोय या सर्व बाबी संशयास्पद असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणून दिले.
खासदार वानखडे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे खालील पाच मागण्या केल्या आहेत –
1. स्थानक स्थलांतराचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा.
2. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी.
3. रेल्वे स्टेशन चौक–राजकमल चौक उड्डाणपुलाची दुरुस्ती तातडीने सुरू करावी.
4. रेल्वे स्थानकाच्या विस्तार व प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी विशेष योजना मंजूर करावी.
5. रेल्वेची जमीन व्यापारी प्रकल्पांसाठी वापरली जाणार नाही, याची लेखी हमी द्यावी.
शहरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, उद्योगसमूह आणि विविध सामाजिक संघटनांनी स्थानक स्थलांतराला आधीच प्रखर विरोध दर्शविला आहे. “रेल्वे स्थानक हा अमरावतीच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे; त्यावर कुठलाही प्रयोग जनतेला मान्य होणार नाही,” असे वानखडे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
Farmers outcry : महापुरात 14 लाख हेक्टर जमीन खरडून गेली पण केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही!
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही बैठकीदरम्यान, “अमरावतीचे रेल्वे स्थानक कोणत्याही परिस्थितीत हलविले जाणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही खासदार वानखडे यांना दिली.
यापूर्वी खासदार वानखडे यांनी रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. या वेळी झालेल्या चर्चेत, संबंधित पुलाचा ‘सेतूबंध’ योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून जनभावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.








