Bjp core committee : राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजप कोअर कमिटीची निर्णायक बैठक

maharashtra-rajya-sabha-election-bjp-core-committee-vinod-tawde-dhairyasheel-patil-equations : विनोद तावडे, धैर्यशील पाटील शर्यतीत, महाराष्ट्रातील ७ जागांचे स्पष्ट गणित

Mumbai : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होणार असून महाराष्ट्रातील सात जागांवर लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांची नावे अंतिम करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या ३७ रिक्त जागांसाठी देशभरात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च असून ६ मार्च रोजी छाननी होईल. ९ मार्चपर्यंत माघार घेता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता सातपैकी सहा जागांवर महायुतीचे आणि एका जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याचे समीकरण स्पष्ट होत आहे.

Shegao Politics : पोस्टरवरून ‘तणाव’! शेगावच्या मेळाव्यात भाजपचे दोन्ही नेते धीरगंभीर का?

भाजपकडून चार उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी असून एका जागेसाठी रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित तीन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विनोद तावडे यांनी मागील काही वर्षांत राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक कामगिरी बजावली असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या २८६ आहे. सात जागांसाठी निवडणूक होत असल्याने कोटा काढताना २८६ भागिले ८ करून त्यात एक मत अधिक धरले जाते. या गणितानुसार एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान ३७ मतांची आवश्यकता आहे.

संख्याबळाच्या गणितात भाजपकडे १३१ आमदार असून एका अपक्षाचा पाठिंबा गृहित धरल्यास त्यांच्याकडे १३२ मते होतात. ३७ मतांच्या कोट्यानुसार भाजपचे स्वतंत्रपणे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात आणि चौथ्या उमेदवारासाठी आवश्यक अतिरिक्त मते उपलब्ध होऊ शकतात. शिवसेना (शिंदे गट) कडे ५७ आमदार असून एका अपक्षाच्या पाठिंब्यासह ५८ मते होतात. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित विजयी होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडे ४० आमदार असल्याने त्यांचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मोठा दिलासा ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २००४ घरांसाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी

महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ ४९ पर्यंत जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) तसेच सहयोगी लहान पक्ष मिळून एक उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद त्यांच्याकडे आहे. परिणामी महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक असा संभाव्य निकाल दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीतील चर्चेनंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा कधी होते आणि विनोद तावडे किंवा धैर्यशील पाटील यांना संधी मिळते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत संख्याबळाचे गणित स्पष्ट असले तरी उमेदवारीच्या अंतिम निर्णयामुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.