BJP protest : काँग्रेसने संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केला

bjp-protest-against-congress-chai-party-at-parliament-house : काँग्रेसच्या ‘चाय पार्टी’चा भाजपकडून निषेध; संगम चौकात जोरदार निदर्शने

Buldhana संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील संगम चौकात काँग्रेसविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात फलके घेत काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

या वेळी बोलताना विजयराज शिंदे म्हणाले की, संसद ही देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था असून तिची प्रतिष्ठा, परंपरा आणि मर्यादा जपणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरातील प्रवेशद्वाराबाहेर चहा-बिस्किटांसह ‘चहा मेळावा’ आयोजित करून संसदेच्या पवित्रतेचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Anti-Conversion Bill : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ नेमकं काय?

आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील महत्त्वाच्या विषयांवर जनतेला दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत घरगुती गॅसच्या दरांबाबत काँग्रेसकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीकाही आंदोलनादरम्यान करण्यात आली.
या निषेध आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगम चौक परिसरात काही काळ घोषणाबाजीमुळे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.