BMC Election 2026: रामदास आठवलेंनी ३९ उमेदवार उतरवताच १२ जागा देण्यावर सहमती

BJP-Shinde group finally finds solution for RPI : भाजप–शिंदे गटाचा रिपाइंसाठी अखेर तोडगा

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची अधिकृत एन्ट्री झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत थेट ३९ उमेदवारांचे अर्ज दाखल करत दबावाची राजकीय खेळी खेळल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने मोठा निर्णय घेत रिपाइंला एकूण १२ जागा सोडण्यावर सहमती दर्शवली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) प्रत्येकी सहा-सहा जागा रिपाइंसाठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत आधीच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटप निश्चित झाले होते. त्यानुसार भाजप १३७ तर शिंदे गट ९० जागांवर लढत होता. मात्र रिपाइंला जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज झाले होते. या नाराजीची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही ठाण्यात भेट घेतल्यानंतर युतीत रिपाइंसाठी जागा देण्याचा मार्ग निघाला.

ZP Election 2026 : महापालिकेनंतरच जिल्हा परिषद;लवकरच आचारसंहिता

रिपाइंच्या एन्ट्रीनंतर मुंबईतील महायुतीचे अंतिम गणित बदलले आहे. आता भाजप १३१, शिवसेना (शिंदे गट) ८४ आणि रिपाइं १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. दोन प्रभागांमध्ये एबी फॉर्मचा घोळ झाल्याने त्या ठिकाणी युतीचा एकही अधिकृत उमेदवार नसल्याची माहितीही पुढे आली आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाने मुंबईत जवळपास ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. युतीतून जर १२ जागा अधिकृतपणे मिळाल्या, तर उर्वरित जागांवर रिपाइंचे उमेदवार अपक्ष म्हणून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही प्रभागांत युतीसमोरच मैत्रीपूर्ण पण तिरंगी लढतीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिपाइं (आठवले गट) कडून मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये विविध भागांतील नावे समाविष्ट आहेत. यात वॉर्ड क्रमांक १८६ मधून स्नेहा सिद्धार्थ कासारे, १८८ मधून रॉबिनसन मारन नायागाम, १८१ मधून बापूसाहेब योहान काळे, २०० मधून सचिनभाई मोहिते, १४६ मधून रमेश शंकर सोनावणे, १५२ मधून दिक्षा गायकवाड, १५५ मधून ज्योती जेकटे, १४७ मधून प्रज्ञा सदाफुले, १५३ मधून संजय डोळसे, १५४ मधून संजय इंगळे, १९८ मधून निलीमा मानकर, २१० मधून गणेश वाघमारे यांचा समावेश आहे.

याशिवाय २२३ मधून विनोदकुमार साहू, २१४ मधून मनोहर कुलकर्णी, ९० मधून श्रावण मोरे, ८९ मधून नितीन कांबळे, ९३ मधून सचिन कासारे, उत्तर मध्य मुंबईतून विक्रांत विवेक पवार, नम्रता बाळासाहेब गरुड, विनोद भाऊराव जाधव, ईशान्य मुंबईतून रागिणी प्रभाकर कांबळे, राजेश सोमा सरकार, हेमलता सुनील मोरे, राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, भारती भागवत डोके, सतिश सिद्धार्थ चव्हाण, उत्तर मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबईतील अनेक प्रभागांतील उमेदवारांची नावे यादीत आहेत.

Municipal election : बंडोबांना थंड करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात

एकूणच रामदास आठवले यांनी मुंबईत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजप–शिंदे गटाला रिपाइंसोबत समझोता करावा लागला आहे. मात्र १२ अधिकृत जागांपलीकडे उर्वरित रिपाइं उमेदवार स्वबळावर लढल्यास काही प्रभागांत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील एक-दोन दिवसांत या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.