Disqualification Looming Over Ex-Mayor : प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे धाव
Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) २०२६ च्या निवडणुकीपूर्वीच मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Affidavit) फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली असून, त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते निलेश राणे यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.
आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना म्हटले की, “निवडणूक नियमावलीच्या १२५-ए कलमानुसार कोणताही उमेदवार आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवू शकत नाही. किशोरी पेडणेकर यांच्यावर दोन एफआयआर (FIR) दाखल असूनही त्यांनी त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. आम्ही याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ आणि त्या १०१% अपात्र ठरतील.”
निलेश राणे यांनी कोविड काळातील गाजलेल्या ‘बॉडी बॅग’ घोटाळ्याचा पुनरुच्चार करत पेडणेकरांवर निशाणा साधला. “ज्या बॉडी बॅगची किंमत १६०० रुपये होती, त्या ६७१९ रुपयांना खरेदी करण्यात आल्या. हा सर्वसामान्यांच्या पैशांचा उघड लुटमार आहे,” असा आरोप त्यांनी केला. “किशोरीताईंनी स्वतःहून निवडणुकीतून माघार घ्यावी. जर त्या चुकून निवडून आल्या, तरी अपात्र होण्यापासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. वरळीकरांना सहा महिन्यात पुन्हा पोटनिवडणूक नकोय,” असा टोलाही त्यांनी लगावला.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) या प्रकरणाचा तपास करत आहेत. आयोगाने सोमय्या यांना पुराव्यांसह शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे. जर प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचे सिद्ध झाले, तर पेडणेकर यांची उमेदवारी रद्द होऊन त्यांना मोठा राजकीय धक्का बसू शकतो.
Prakash Mahajan : ‘सत्ता आली तर दोघांच्या बायकांमध्ये भांडण लागेल’, प्रकाश महाजनांचा टोला
या आरोपांमुळे मुंबईच्या राजकारणात ‘प्रतिज्ञापत्र युद्ध’ सुरू झाले असून, ठाकरे गटाकडून यावर काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








