BMC Election: मुंबईत जन्म होऊन म्हातारे होईपर्यंत एकही समस्या सुटली नाही

Chief Minister Devendra Fadnavis strongly attacks Thackeray brothers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल

Mumbai : मुंबईत जन्म झाल्याचा दाखला देत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी येथील प्रचार सभेत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होईपर्यंत पोहोचले, तरी मुंबईची एकही मूलभूत समस्या सोडवू शकले नाहीत, असा थेट आरोप करत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

फडणवीस व इतर भाजप नेत्यांचा जन्म मुंबईत झाला नसल्यामुळे त्यांना मुंबईचे प्रश्न समजत नाहीत, तर आम्ही मुंबईत जन्माला आल्यामुळे शहराच्या समस्या आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहेत, अशी टीका ठाकरे बंधूंनी यापूर्वी केली होती. त्याच वक्तव्याचा संदर्भ घेत फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईच्या संकल्पनेची आणि विकासाच्या मुद्द्यांची सखोल जाण होती, मात्र त्यांचा जन्म पुण्यात झाला होता. जन्म कुठे झाला यापेक्षा मुंबईसाठी काय काम केले, हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Political Strategies : चिखली नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी; सत्ताधारी गटाकडून ४ तर विरोधकांकडून एकमेव अर्ज

ज्यांचा जन्म मुंबईत झाला, ते आज म्हातारे होईपर्यंत पोहोचले असले तरी मुंबईसाठी एकही ठोस काम दाखवू शकत नाहीत. मुंबईतील वाहतूक, घरबांधणी, पायाभूत सुविधा किंवा मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी नेमके काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. केवळ मुंबईत जन्माला आलो म्हणून हारतुरे घालायचे का, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

आपल्या भाषणात फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असून, ही कामे आमच्या सरकारने प्रत्यक्षात आणली असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगरी रेल्वेतील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य सरकारने पुढाकार घेत केंद्र सरकार व रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. त्यातून मेट्रोच्या धर्तीवर उपनगरी लोकल गाड्यांचे डबेही वातानुकूलित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Municipal elections : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचा घणाघात

वातानुकूलित लोकल सुरू झाल्या तरी मुंबईकरांच्या प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. द्वितीय वर्गाच्या भाडेदरात एक रुपयाचीही वाढ न करता मुंबईकरांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय बीडीडी चाळी, अभ्युदय नगर यांसारखे महत्त्वाचे गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प आमच्या सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या कार्यकाळात मराठी माणसासाठी आणि पुनर्वसन प्रकल्पांसाठी नेमके काय केले, याचे उत्तर त्यांनी मुंबईकरांना द्यावे, असे आव्हान देत फडणवीस यांनी आपल्या भाषणातून ठाकरे बंधूंवर जोरदार राजकीय हल्ला चढवला.