Explosion of discontent in BJP, Shiv Sena, Thackeray group and MNS : भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेत नाराजीचा स्फोट
Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने काल रात्री उशिरापर्यंत सर्व प्रमुख पक्षांमध्ये एबी फॉर्म वाटपाची धावपळ सुरू होती. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनी आपल्या उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म देत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. मात्र अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने मुंबईतील विविध प्रभागांमध्ये उघडपणे बंडखोरीला तोंड फुटले आहे.
भाजपमध्ये सर्वाधिक नाराजी वॉर्ड क्रमांक २०० मध्ये पाहायला मिळाली. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले इच्छुक गजेंद्र धुमाळ आणि संजय दास्ताने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शाखाप्रमुख आशिष कोदे यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत बंडखोरी केली. कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो, अशी भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. या मतविभाजनाचा थेट फायदा ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Banner war: भाजपच्या ‘नमो भारत, नमो ठाणे’ला मनसेचे ‘मौन भारत, मौन ठाणे’ ने उत्तर
दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्येही असंतोष उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे गटाने माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिंदे गटातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पाटणकर हे काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर सपत्नीक गेले होते. या जागेसाठी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे, भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडूलकर आणि उबाठातून आलेले प्रकाश पाटणकर असे तीन इच्छुक मैदानात आहेत. यामध्ये प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडूलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक ५ वर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. या एका जागेसाठी तब्बल पाच तास नंदनवन बंगल्यावर वरिष्ठ नेत्यांची खलबते झाली. भाजपकडून आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांच्यासाठी आग्रह होता. मात्र माजी नगरसेविका संजना घाडी या नुकत्याच उबाठा सोडून शिंदे गटात आल्या असून, त्यांना उमेदवारीची हमी देण्यात आली होती. अखेर त्यांना वॉर्ड क्रमांक ५ ऐवजी वॉर्ड क्रमांक ४ देण्याचा निर्णय झाला, मात्र त्या या जागेसाठी फारशा उत्साही नाहीत. कारण या वॉर्डमध्ये आमदार प्रकाश सुर्वे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ४ मधील उमेदवारीवर अद्याप संभ्रम कायम आहे.
Jain Muni Nileshchandra : अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ
दादर कबुतरखाना परिसरातील प्रभाग क्रमांक १९२ मध्ये मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्याने माजी नगरसेविका स्नेहल जाधव नाराज झाल्या. या नाराजीतून त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गोरेगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख समीर देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून त्यांच्या पत्नी राजूल देसाई यांना वॉर्ड क्रमांक ५६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. समीर देसाई यांच्या प्रवेशामुळे आजूबाजूच्या तीन वॉर्डमध्ये भाजप-महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बोरिवली पूर्वेकडील प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर दिंडोशीतील प्रभाग क्रमांक ३७ मध्ये शिंदे गटाच्या सिद्धी शेलार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.
एबी फॉर्म वाटपानंतर उफाळलेली ही नाराजी आणि बंडखोरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत असून, अनेक प्रभागांमध्ये समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








