BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप

State leaders’ complaints to the central leadership, creating chaos in Delhi: राज्यातील नेत्यांचा केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारींचा पाढा, दिल्लीत खलबतं

Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीत अस्वस्थता वाढली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याची तक्रार थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील नेतृत्वासमोर आपली नाराजी व्यक्त करत शिंदे गटाच्या कामगिरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा लढवल्यामुळे युतीचा एकूण स्ट्राईक रेट घसरला. भाजपने जर अधिक जागा लढवल्या असत्या, तर पक्ष 100 पेक्षा जास्त जागा सहज जिंकू शकला असता, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर मांडली आहे. मुंबईत शिंदे गटाची कामगिरी निराशाजनक ठरली असून 90 जागा लढवून केवळ 29 जागा जिंकता आल्याने महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं, असा आरोप केला जात आहे.

Nitin Nabin : नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटाने निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. या तथाकथित ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरही भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा प्रकारामुळे चुकीचा संदेश जात असल्याचं मत केंद्रीय नेतृत्वासमोर मांडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भाजपने 135 जागा लढवून 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने तुलनेने कमी स्ट्राईक रेट नोंदवला.

मुंबई महापालिकेच्या निकालात 89 जागा जिंकत भाजप शहरात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गट 29 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून, मनसेला 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला असून ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहिल्याचं चित्र आहे.

पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने 135 पैकी 89 जागा जिंकत 66 टक्के स्ट्राईक रेट नोंदवला आहे. ठाकरे गटाने 160 पैकी 65 जागा जिंकून 40.62 टक्के स्ट्राईक रेट मिळवला, तर शिंदे गटाचा स्ट्राईक रेट 32.22 टक्क्यांवर घसरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिली आहे.

मतांच्या टक्केवारीतही भाजप आघाडीवर असून पक्षाला 45.39 टक्के मते मिळाली आहेत. ठाकरे गटाला 27.37 टक्के, शिंदे गटाला 10.28 टक्के, तर काँग्रेसला 9.41 टक्के मते मिळाली आहेत. अंतिम निकालानुसार 227 सदस्यांच्या सभागृहात भाजप 89, ठाकरे गट 65, शिंदे गट 29, काँग्रेस 24, मनसे 6, एमआयएम 8, राष्ट्रवादी 3, समाजवादी पार्टी 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागेवर विजयी झाला आहे.

BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्याची चर्चा असून, आगामी महापौर निवड आणि पुढील राजकीय निर्णयांवर या तक्रारींचा काय परिणाम होणार, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.