Suspense remains on the BJP-Shinde Sena alliance : भाजप-शिंदे सेनेच्या मनोमिलनावरही सस्पेन्स कायम
Mumbai : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवड, जागावाटप आणि युतीबाबत जोरदार बैठका सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापालिका निवडणुकांसाठी मतदान आणि त्यानंतर लगेच जाहीर होणारा निकाल याला आता मोजकेच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक प्रमुख पक्ष आपापली रणनीती अंतिम टप्प्यात ठरवत आहे. 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी अर्ज दाखल झाले असले तरी अधिकृत उमेदवार घोषणांबाबत अजूनही गुप्तता पाळली जात आहे.
PMC election : अर्ध्या रात्री बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली
सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक पक्ष शेवटच्या दिवशीच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणार आहेत.
प्रत्येक पक्षात अंतर्गत बैठकांचा धडाका सुरू असून स्थानिक समीकरणे, उमेदवारांची स्वीकारार्हता, जातीय-सामाजिक गणित आणि विजयाची शक्यता यांचा सखोल आढावा घेतला जात आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीत सन्मानजनक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला असून येत्या दोन दिवसांत उमेदवारांच्या अंतिम यादीला आकार दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या संदर्भात भाजप आणि शिंदे गटातील युतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आल्या असतानाही ठाण्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. शुक्रवारी रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी युतीच्या फॉर्म्युल्यावर तिसरी बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे आणि खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या चर्चेतही ठोस तोडगा न निघाल्याने पेच कायम राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाला शेवटचा अल्टिमेटम दिल्याची चर्चा आहे. ठाणे आणि कल्याण महापालिकांमध्ये भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्याने जागावाटपाचा तिढा कधी सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा सुरू असतानाच महायुतीतील आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र जपून पावले टाकताना दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाची युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन कोणत्या महापालिकेत कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवली जाणार, याची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
Local Body Elections : पुरे झाली राजकीय चिखलफेक, आता काम करा!
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील 29 महापालिकांपैकी बहुतांश महापालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर, सोलापूर आणि अमरावती या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.
धुळे आणि अहिल्यानगर महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता असून नांदेड आणि नाशिक महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजपविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एकंदर पाहता, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच असून जागावाटपाचे तिढे सुटणार की शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__








