BMC election : भाजप १२८ तर शिंदेंची शिवसेना ७९ जागा लढवणार

The remaining 20 seats are likely to be resolved today. : उर्वरित २० जागांवर आज तोडगा निघण्याची शक्यता

Mumbai: मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, त्याआधी महायुतीतील जागावाटपाचा मोठा पेच जवळपास सुटल्यात जमा झाला आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपावर प्राथमिक एकमत झाले असून, भाजप १२८ तर शिवसेना ७९ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे एकूण २०७ जागांवर सहमती झाली असून, उर्वरित २० जागांवर चर्चा अद्याप सुरू आहे. या जागांवर आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या उर्वरित जागांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. महायुतीतील तिसरा घटक असलेला अजित पवारांचा पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून, ते सुमारे १०० जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे.

Akola Municipal Corporation Election : “मान-सन्मान नको, पण अपमानही का सहन करायचा?”

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी जागावाटपाबाबत माहिती देताना सांगितले की, भाजप १२८ आणि शिवसेना ७९ अशा २०७ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उर्वरित २० जागांवर चर्चा सुरू असून, त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. उमेदवारांची ताकद आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन या जागांवर भाजप किंवा शिवसेना कोण लढणार याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनीही महायुतीच्या तयारीवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, मुंबईतील २२७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असा दावा त्यांनी केला. जागावाटप आणि वाटाघाटी या दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

Akola Municipal Corporation Elections : आघाडीची चर्चा सुरू असतानाच पाच उमेदवारही जाहीर केले

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली असून, त्यात जनसभा, संयुक्त प्रचार आणि जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संयुक्त सभा मुंबईत होणार असून, प्रचाराला १ किंवा २ तारखेपासून सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली असली तरी त्यांच्याकडेही जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबईतील जागावाटप जवळपास स्पष्ट झाल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

__