BMC Mayor 2026: शरद पवारांचा ठाकरे-मनसे आघाडीला धक्का

bmc-mayor-2026-sharad-pawar-support-shiv-sena-shinde : शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत मुंबई महापालिकेत मोठा राजकीय उलटफेर

Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीआधीच मोठा राजकीय भूकंप झाला असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधू आणि मनसेसोबतची साथ सोडत थेट महायुतीला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 7 फेब्रुवारी रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर 11 फेब्रुवारीला महापौरपदाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र याआधीच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिला आहे.

Mumbai-Pune traffic jam : एक टँकर उलटल्याने तब्बल 32 तास वाहतूक रखडली !

या निर्णयामुळे महायुतीच्या पारड्यात एक महत्त्वाचा आकडा जोडला गेला असून, महापौर निवडणुकीतील ‘संख्या’ व्यवस्थापन अधिक भक्कम झाले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि मनसेसोबत लढणाऱ्या शरद पवार गटाने थेट शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणं म्हणजे ठाकरे-मनसे आघाडीला दिलेला राजकीय धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई महानगरपालिकेत यावेळी तब्बल 25 वर्षांची ठाकरे यांची सत्ता उलथवून भाजप युतीने मोठा विजय मिळवला आहे. 227 जागांच्या सभागृहात भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून, शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.

Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे

महापौर निवडणूक तोंडावर असताना सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानापूर्वी शहर सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. 9 फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेमुळे काही नगरसेवक कोकणात जाण्याची शक्यता लक्षात घेता पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी बाळगली जात आहे. ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे आदेश दिले आहेत, तर भाजप आणि शिंदे गटाकडूनही 10 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Weather Alert : महाराष्ट्रात तापमानात चढउतार, काही भागात पावसाचा इशारा

शरद पवार गटाच्या या निर्णयामुळे महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना निर्णायक वळण मिळाले आहे. ठाकरे-मनसे आघाडीच्या गणितात आता मोठी पोकळी निर्माण झाली असून, महायुती अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. महापौरपदावर अखेर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पुढील काही दिवस मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

___