Mumbai mayoral race sparks strain between BJP and Shivsena : अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून युतीत पेच; मुंबईच्या ‘तिजोरी’साठी शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढली
Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी सत्तेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी २९ नगरसेवक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (शिंदे गट) ‘अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदा’ची मागणी लावून धरल्याने महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सत्तेच्या वाटाघाटींचा धागा आता थेट नाशिक महानगरपालिकेशी जोडला जात असून, दोन्ही शहरांत सत्तेचे समसमान वाटप करण्याचा नवा ‘फॉर्म्युला’ चर्चेत आला आहे.
मुंबईत बहुमतासाठी ११४ हा आकडा आवश्यक आहे. भाजप-शिवसेना युतीकडे एकूण ११८ (८९+२९) नगरसेवक असल्याने सत्ता स्थापन करणे तांत्रिकदृष्ट्या सोपे आहे. मात्र, शिवसेनेने महापौरपदाचा अर्धा कार्यकाळ मागितल्याने भाजपची अडचण झाली आहे. भाजप पाच वर्षे स्वतःचा महापौर बसवण्यासाठी आग्रही आहे, तर शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून दबावाचे राजकारण सुरू केले आहे. “मुंबईचा पैसा आणि नियोजन ज्यांच्या हातात, त्यांचीच सत्ता,” या सूत्रासाठी दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत.
zero vote : “घरच्यांची मतं जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत कुठे गेलं?”
मुंबईतील हा पेच सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा वापर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये १२२ जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकून तिथे एकहाती सत्ता मिळवली आहे, तर शिंदे गटाला २६ जागा मिळाल्या आहेत. मुंबईत भाजपने संपूर्ण पाच वर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवावे आणि त्याबदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा (उपमहापौरपद, स्थायी समिती सभापती किंवा महत्त्वाची विषय समिती पदे) द्यावा, असा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उद्या, गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयात राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) किंवा ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे पद विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव झाले, तर ज्या पक्षाकडे त्या प्रवर्गाचा नगरसेवक आहे, त्याचे पारडे जड होईल. यामुळे उद्याच्या आरक्षणाकडे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे.
Akola Congress : संशयित म्हणून नाव आले आणि पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला
निवडणुकीत मुंबईत युती होती, तर नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना (उद्धवसेना) आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. मात्र, आता सत्तेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा महायुतीचेच पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडहून परतल्यानंतरच या दोन्ही शहरांच्या ‘पॅकेज’ डीलवर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत.








