Boy locked Anganwadi : धक्कादायक… अंगणवाडीत चार वर्षीय बालक रात्रभर अडकला!

nagpur-khaparkheda-anganwadi-four-year-old-boy-locked-overnight-negligence-incident : निष्काळजीपणामुळे संताप, सुदैवाने सकाळी सुरक्षित सुटका

Nagpur : जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अंगणवाडी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार वर्षीय बालक रात्रभर इमारतीत अडकून राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरकर लेआऊट येथील अंगणवाडीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुदैवाने संबंधित बालक सकाळी सुरक्षित अवस्थेत आढळून आले असून कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालक संध्याकाळच्या सुमारास खेळत असताना अंगणवाडीच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत गेला. खेळता खेळता त्याला त्या ठिकाणीच झोप लागली. दरम्यान, नियमित वेळेनुसार अंगणवाडी बंद करताना कर्मचाऱ्यांनी सर्व खोल्यांची प्रत्यक्ष पाहणी न करता घाईत कुलूप लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे बालक आतच राहून गेला आणि संपूर्ण रात्र खोलीत अडकून राहिला.

Prakash Bharsakle : आमदार भारसाकळेंना मागितली दोन कोटींची खंडणी?; बिश्नोई गँगच्या नावाने कथित फोन

सायंकाळी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, शेजारी आणि ओळखीच्या ठिकाणी चौकशी करूनही मुलाचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीने शोधमोहीम सुरू केली. सात स्वतंत्र पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच आसपासच्या भागात शोधकार्य राबवण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणवाडी उघडण्यात आली असता संबंधित बालक आतमध्ये सुरक्षित अवस्थेत आढळून आला. रात्रभर तो खोलीतच अडकून असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. वैद्यकीय तपासणीत बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Amravati DPC fund : ‘डीपीसी’तील विकासकामात ‘फिक्सिंग’ची चर्चा; ३० निविदा पडून तरीही विलंब

या प्रकारानंतर पोलिस प्रशासनाने अंगणवाडी व शाळा व्यवस्थापनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. शाळा किंवा अंगणवाडी बंद करताना प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून भविष्यात अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.