The cemetery site disappeared : सरपंच पतीसह ग्रामस्थांचे आमरण उपोषण; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आरोप
Buldhana स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मुंदेफळ (ता. मेहकर) येथील स्मशानभूमीचा प्रश्न चिघळला आहे. शासकीय दप्तरी स्पष्ट नोंद असूनही प्रत्यक्षात स्मशानभूमीची जागा गायब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गावच्या सरपंच पतीसह ग्रामस्थांनी गट क्र. २० मधील वादग्रस्त जमिनीवर आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या प्रश्नासाठी पाठपुरावा करीत असूनही, ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले ना प्रशासनाने उपाययोजना केल्या. सातबारा उतारा, ८-अ व इतर शासकीय नोंदींनुसार स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेली ०.४० आर जमीन आज अतिक्रमणाच्या सावटाखाली गेली आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती मरण पावल्यास अंत्यसंस्कारासाठी गावात निश्चित जागा उपलब्ध नाही, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.
गावकऱ्यांनी वेळोवेळी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि स्थानिक आमदार व खासदार यांच्याकडे निवेदने दिली, मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून, लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास ग्रामस्थांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरपंच पती अनंत (गोपाल) चांदणे, रमेश डीगांबर चांदणे, अमोल रमेश चांदणे, देवानंद नारायण चांदणे, सुनिल रामराव चांदणे, सागर समाधान शिंदे हे उपोषणात सहभागी झाले आहेत़
ग्रामस्थांच्या मागण्या
गट क्र. २० मधील वादग्रस्त जमिनीचे भूमापन तात्काळ करण्यात यावे.अतिक्रमण तत्काळ हटवावे.सदर जमीन स्मशानभूमीसाठी अधिकृतपणे खुली करावी.
स्थानिक राजकीय नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, हे प्रकरण आता राजकीय व सामाजिक संवेदनशीलतेचे रूप धारण करू लागले आहे.