Protest against the administration in Sindkhedraja : सिंदखेडराजा येथे उदासीनतेविरोधात अनोखे आंदोलन
Sindakhed Raja : शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या अभावावर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांनी अनोख्या पद्धतीने दंडवत आंदोलन करत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
सध्या सिंदखेडराजा शहरात अंतर्गत जलवाहिनी व भूमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या कामांची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारक असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. धूळ, खड्डे, वाहतूककोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी दुर्लक्ष करत असल्याची टीका कैलास मेहेत्रे यांनी यावेळी केली.
राजवाडा परिसरापासून नटराज चौक, त्रिगुणी पार, माणिक चौक, आढाव गल्ली, सोमवार पेठमार्गे रामेश्वर मंदिरापर्यंत शेकडो दंडवत घालून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. हे आंदोलन शहरात राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे. गणेशोत्सवपूर्वी कामे पूर्ण झाली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाला सतीश आढाव, प्रदीप मेहेत्रे, भुजंग जाधव, लक्ष्मण ढवळे, रामेश्वर मंडळकर, खंडू मेहेत्रे, संदीप जाधव, महेंद्र मस्के, संजय म्हस्के, प्रल्हाद मेहेत्रे यांच्यासह सिंदखेडराजा युवा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.
Adv. Abhijit Wanjari : उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० पदे रिक्त!
स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सत्ताधाऱ्यांनी वेळेत उपाययोजना न केल्यास हे आंदोलन शहरात जनआंदोलनाचे रूप घेईल, असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे.