Internal rift within the Mahayuti over ₹150 crore worth works : कामे कुणाला दिली हे जाहीर करा, शिंदेंचे गायकवाडांना आव्हान
Buldhana शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण भाजप कार्यकर्त्यांना १५० कोटींची कामे दिली असा दावा चिखली येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केला होता. आता या कामांवरून महायुतीत कलगीतुरा सुरू झाला आहे. आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे हे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत असतात. आता या कामांवरून पुन्हा या दोघांमध्ये शाब्दीक युध्द सुरू झाले आहे. विजयराज शिंदे यांनी सोमवारी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांच्या दाव्याला निव्वळ राजकीय वल्गना ठरवत, संबंधित कामांची नावे, गावे, लाभार्थी आणि निधीचे तपशील तातडीने जाहीर करण्याचे खुले आव्हान दिले.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “१५० कोटी तर दूरच, दीड कोटींचीदेखील कामे भाजप कार्यकर्त्यांना मिळाल्याचे एकही उदाहरण दाखवता येणार नाही.” त्यामुळे गायकवाड यांच्या वक्तव्यामागील नेमका राजकीय हेतू काय, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले
Vanchit Bahujan Aghadi : चूल पेटवली, भाकरी थापल्या आणि तिथेच जेवण केले
याचवेळी स्थानिक स्तरावरील टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेचाही मुद्दा पुढे आला. काही ठरावीक गटांकडेच कामांची मक्तेदारी गेल्याचा संशय व्यक्त करत, टेंडर प्रक्रिया ‘बिलो’ न जाण्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता प्रशासनिक पारदर्शकतेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत.
आमदार गायकवाड यांनी यापूर्वी केलेल्या “३५ कोटींचे कमिशन सोडले” या वक्तव्यावरही भाजपने उपरोधिक टीका करत निशाणा साधला. काही पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा सूरही पत्रकार परिषदेत उमटला.
दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांच्या विधानांचाही संदर्भ देत, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचे संपूर्ण श्रेय एका घटकाला देण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत आहे.








