sandip-shelke-resigns-ubt-shivsena-buldhana-political-crisis : लोकसभा निवडणुकीतील ‘वन मिशन’ फेम नेत्याची एक्झिट; जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?
Buldhana जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेळके हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या, अखेर गुरुवारी त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘वन मिशन’ मोहिमेद्वारे त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मेहकर परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू असतानाच, जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने साथ सोडल्याने संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संदीप शेळके यांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की त्यामागे पक्षांतर्गत नाराजी आहे, याबाबत आता विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
शेळके आता आगामी काळात कोणत्या राजकीय पक्षाची वाट धरतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, त्यांच्यासोबत आणखी काही स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते पक्ष सोडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Nitin gadkari : “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ”
दरम्यान, जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या मरगळीबाबतही आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटना कितपत सक्रिय आहे, याबाबत खुद्द कार्यकर्त्यांमध्येच नाराजीचा सूर उमटत असल्याचे समजते. अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांत जिल्हा संपर्क प्रमुखांची उपस्थिती केवळ नावापुरतीच आहे.
संघटनात्मक वाढीसाठी आवश्यक असलेला प्रभाव दिसत नसल्याची टीका राजकीय निरीक्षकांकडून केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील उद्धवसेनेत सध्या अस्वस्थतेचे वातावरण असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे संघटनात्मक बदल किंवा नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.








