व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cabinet decisions : आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करण्यास...

Cabinet decisions : आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करण्यास मंजुरी

maharashtra-cabinet-8-decisions-asha-bhosle-music-academy-mumbai-marathi-news : मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

Mumbai: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्याचा विविध क्षेत्रांवर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी अर्थपूर्ण उपक्रम राबवावा, यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या नावाने स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांनी पूर्वी व्यक्त केलेली इच्छा पुढे नेत संगीत अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. वांद्रे-अंधेरी परिसरात या अकॅडमीसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

या बैठकीत शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ या दृष्टीकोनानुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होणाऱ्या विविध सेवांतील संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच संयुक्त परीक्षा योजनेत नव्या सेवांचा समावेश करून भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून ‘निपुण सेतू’ उपक्रम राबवून रोजगार संधी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Bishnoi gang threat : मराठी सक्तीवरून बिष्णोई गँगची आरटीओ अधिकाऱ्याला धमकी

नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार कुळगाव-बदलापूर येथील मंजूर विकास आराखड्यात बदल करून वीज उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे चार एकर जमीन टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

ग्रामीण आणि सागरी भागाच्या विकासासाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नाबार्डच्या निधीतून मच्छिमारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग सेवा आणि आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून सुमारे ३ हजार ७०८ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Ashok kharat case : अशोक खरातसोबत राजकीय व्यक्तींचेही व्हिडीओ असल्याचा दावा

नियोजन विभागाच्या प्रस्तावानुसार नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण १७७ तालुक्यांमध्ये संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवता येणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेशी संबंधित कायद्यात सुधारणा करून संस्थात्मक रचना अधिक सक्षम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या सर्व निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून विशेषतः आशा भोसले यांच्या नावाने उभारण्यात येणारी संगीत अकॅडमी ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

error: Content is protected !!