Strong demand from all party MLAs to Ajit Pawar : सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे तीव्र मागणी
Mumbai :गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळी, ऊस, सोयाबीन, कापूस, हळद अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी मंगळवारी अजित पवार यांना भेटून निवेदन दिले. परभणी, हिंगोलीसह बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
OBC Reservation : ओबीसी विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवणे ही सत्ताधाऱ्यांची खेळी
आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, “गेल्या 50 वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नव्हता. माझ्या मतदारसंघात अतोनात नुकसान झाले आहे. आयुष्यात इतके नुकसान कधी पाहिले नव्हते. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. अजितदादांनी यावर गंभीरपणे विचार करण्याचे आश्वासन दिले असून आजच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.”
तर आमदार राजू नवघरे यांनी सांगितले की, “सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकारने सरसकट मदत द्यावी. शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे.”
मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 32 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील 15, लातूर 4, धाराशिव 7, परभणी 4 आणि हिंगोली जिल्ह्यातील 2 मंडळांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. परभणी जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून पूर्णा, दुधना आणि गोदावरी या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.
Anish Damania : मिस्टर दमानियांची सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती !
हिंगोली जिल्ह्यात चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनसह अनेक पिके वाहून गेली असून कर्ज घेऊन पिकवलेली शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उद्या काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्थानिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
सरकारकडून आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.








