Cabinet meeting : अंबादेवी संस्थानाला चिखलदरातील ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी

Amid turmoil of municipal elections, cabinet takes a big decision : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली असून आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होत आहे. अशा निवडणुकीच्या धामधुमीच्या काळातच महसूल विभागाशी संबंधित एकमेव पण महत्त्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची जमीन श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मौजे चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकूण ३ एकर ८ आर जमीन शासन ताब्यात घेऊन ती विनामूल्य श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Expulsion of city president : चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन १९७५ साली पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. मात्र अनेक दशकांनंतरही या जमिनीचा अपेक्षित वापर न झाल्याने ती जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी संस्थानाने शासनाकडे जमिनीची मागणी केली होती.

या मागणीचा विचार करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे ३ एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेण्याचा आणि ती जमीन श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जमीन संस्थानाला भोगवटादार वर्ग–२ या स्वरूपात देण्यात येणार असून ती जमीन केवळ धार्मिक आणि देवस्थान विकासाच्या प्रयोजनासाठीच वापरता येणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

BMC election : ६३ जागांची मागणी करूनही वंचितकडून १६ जागांवर उमेदवारच नाहीत

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय अमरावती जिल्ह्यासाठी आणि विशेषतः चिखलदरा येथील धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आता या निर्णयामुळे देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात असून, निवडणूक काळात घेतलेल्या या निर्णयाकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.